'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'

राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा जरांगे यांचा आरोप

'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'

मुंबई: प्रतिनिधी

उपोषण सुरू करून दोन दिवस उलटले तरी देखील मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे उद्यापासून पाणी देखील न घेता कडक उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. निर्णय घेण्याबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. 

मराठा आरक्षणाबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत त्वरित तोडगा काढण्याचे आदेश त्यासाठी नेमलेल्या उपसमितीला दिल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आदेश मिळाल्यानंतर देखील आरक्षणाचा निर्णय घेण्यास का विलंब होत आहे, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. 

मुंबईत आल्यावर आंदोलन दोन-तीन दिवसात कंटाळून परत जातील आणि आंदोलनाची तीव्रता कमी होईल, असे सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत आणखी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत. आरक्षणाबाबत लवकर निर्णय न झाल्यास सरकारवर दबाव वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने महिला देखील आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती मराठवाड्यातील संयोजकांनी दिली आहे. जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर वाशीपासूनच रास्ता रोको, रेल रोको करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा  अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?

मराठा आंदोलक पुन्हा मुंबईत कसे आले, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा, असे सांगणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे हलक्या कानाचे आणि मानाला भुकेलेले आहेत, अशी टीका जरांगे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे वाटोळे करतील. तुमच्या मुलाला विधानसभा निवडणुकीत त्यांनीच पाडले होते, असेही ते ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. 

जरांगे यांचे आंदोलन सामाजिक नाही तर राजकीय असल्याची टीका करणारे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील जरांगे यांनी टीका केली. तुम्ही फार लांब जात आहात. मात्र, तुम्ही जवळच आहात. कोल्हापूरला, राजघराण्याच्या भागात आहात. आता आमच्या विरोधात बोलू नका. मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका, असे ते म्हणाले. 

About The Author

Advertisement

Latest News

गणेशोत्सव - राज्य महोत्सवा’चा शासकीय निर्णय का नाही? गणेशोत्सव - राज्य महोत्सवा’चा शासकीय निर्णय का नाही?
राज्य महोत्सवाबाबत तरतुद, नियमावली वा निश्चित व्याख्या’ काय? पुणे: प्रतिनिधी गणेश भक्तांमध्ये केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्याकरता केलेल्या घोषणेशिवाय गणेशोत्सवाला राज्य...
मराठा समाजाला तात्काळ हक्काचे आरक्षण द्या
'मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करा'
मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी
'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही'
'मराठा आंदोलकांना सुविधा देणे ही आपली जबाबदारी'
'एक तर मुंबईतून विजययात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा...'

Advt