- राज्य
- 'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?'
'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?'
विखे पाटील यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मराठा आरक्षणाबाबत आम्हाला सल्ले देत आहेत. मात्र, तुम्ही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होतात तेव्हा हे लक्षात आले नाही का? तेव्हा मराठा समाजाची का अवहेलना केली, असे सवाल करत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी आरक्षणाचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवर पुढाकार घेऊन घटनादुरुस्ती केली पाहिजे, असे पवार नुकतेच म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षण हा विषय आत्ता उद्भवलेला नाही. अनेक दशकांपासून ही मागणी केली जात आहे. आपण यापूर्वी अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री होतात. त्यावेळी देखील मराठा आरक्षणाची मागणी होतीच. तेव्हाही बाब लक्षात आली नाही का, असा खोचक सवाल विखे पाटील यांनी केला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणण्यास न्यायालयाचा नकार
मराठा समाजाला सरसकट इतर मागास प्रवर्गातून आरक्षण दिले जावे ही मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणता येणार नाही, हे यापूर्वीच्या दोन प्रकरणात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. ही या प्रकरणातील गुंतागुंत आहे. त्यावर काय मार्ग काढता येईल याचा विचार करण्यासाठी महाधिवक्त्यांबरोबर आज संध्याकाळी बैठक होत आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.