- देश-विदेश
- 'देशाला सक्षम पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची आवश्यकता'
'देशाला सक्षम पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची आवश्यकता'
मोदी आणि शहा फोडाफोडी करण्यात मग्न असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
नवी दिल्ली: प्रतिनिधी
विद्यमान केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून देशाला सक्षम पंतप्रधान, गृहमंत्री यांची आवश्यकता आहे. मोदी आणि शहा देशाच्या हितापेक्षा इतर पक्षात फोडाफोडी करून भारतीय जनता पक्षाचे हित साधण्यात मग्न आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर, विशेषतः परराष्ट्रीय नीती मध्ये सपशेल अपयशी ठरले आहे. मोदी यांनी संपूर्ण जग पालथे घातले. जगात कोणताही भाग असा नसेल की तिथे मोदी यांनी भेट दिली नाही. तरीही आज एकही देश आपल्या पाठीशी उभा नाही, असा दावा करून ठाकरे यांनी, कोणते देश आपले मित्र आहेत आणि कोण शत्रू आहेत, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी केली.
पाकिस्तान आपला शत्रू आहे. तरीही आपण त्यांच्याशी क्रिकेट का खेळणार आहोत? चीन आपला शत्रू आहे. तरीही पंतप्रधान मोदी चीनला का भेट देणार आहेत, याचे स्पष्टीकरण पंतप्रधानांनी करावे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री एरवी सगळीकडे मिरवत असतात. मात्र, देशासमोर संकट उभे ठाकले की दोघेही गायब होतात, अशी टीकाही त्यांनी केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधानांची, पर्यायाने भारताची टिंगल करत आहेत. मात्र, त्यांच्या टेरिफ आकाराणीबद्दल पंतप्रधान एका शब्दाने काही बोलायला तयार नाहीत. वास्तविक अवास्तव टेरिफ आकारणीचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर देखील होणार आहे. यावर पंतप्रधानांनी ठाम भूमिका घेणे अपेक्षित आहे. मात्र, ते मूग गिळून गप्प आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
... तर निवडणुकांचा फार्स हवा कशाला?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेतल्या जाणार आहेत. त्यातही आपले मत कोणाला गेले हे स्पष्ट करणारी व्हीव्हीपॅट यंत्रणा यावेळी उपलब्ध असणार नाही. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला धोका आहे. अर्थातच, मतदान यंत्राद्वारे निवडणुका पार पाडण्यास आमचा ठाम विरोध आहे. हेच करायचे असेल तर निवडणुकांचा फार्स हवा कशाला? तुम्हाला हवा असेल तो निकाल लावून टाका, असेही ठाकरे म्हणाले.
हिंदी भाषेला विरोध नाही, सक्ती मात्र नको
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या सक्तीवरून झालेल्या वादाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, आमचा हिंदी किंवा कोणत्याही भाषेला विरोध नाही. मात्र, हिंदी किंवा अन्य भाषा शिकण्याची जबरदस्ती आमच्यावर करू नका, एवढेच आमचे म्हणणे आहे. आज मी आपल्याशी हिंदीत संवाद साधतो आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री हिंदी भाषिक नसताना देखील उत्तम हिंदी बोलू शकतात. आम्ही सर्वांनी पहिलीपासून हिंदीचे शिक्षण घेतले आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला.
मनसेची युतीचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे समर्थ
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संभाव्य युतीबाबत विचारणा केली असता कोणतेही स्पष्ट उत्तर देणे ठाकरे यांनी टाळले. युती करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आपण व मनसे प्रमुख राज ठाकरे समर्थ आहोत. त्यासाठी कोणा तिसऱ्याची आवश्यकता नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.