- देश-विदेश
- 'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी'
'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी'
निवासस्थान नूतनीकरणावरून भाजपचा हल्लाबोल
राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाने होरपळून निघाला असता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधींची उधळपट्टी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. केजरीवाल्यांना नैतिक दृष्ट्या आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाने होरपळून निघाला असता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधींची उधळपट्टी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. केजरीवाल्यांना नैतिक दृष्ट्या आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.
संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीचे थैमान सुरू असताना दिल्लीतील परिस्थितीही बिकट होती. रुग्णालय ओसंडून वाहत होती. लोकांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री केजरीवाल हे आपल्या शासकीय निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात मश्गूल होते. त्यासाठी तब्बल 45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. एकेकाळी एका खोलीच्या घरात राहण्याची भाषा करणारे केजरीवाल यांनी संकट काळात केलेली ही उधळपट्टी नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.
भाजपच्या या आरोपांवर दिल्ली सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सत्ताधारी आम आदमी पक्षाने भाजपच्या आरोपांबाबत खुलासा केला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाची इमारत सन 1942 मध्ये उभारण्यात आली. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे ऑडिट करून नूतनीकरण करणे आवश्यक असल्याची शिफारस केली. त्यानुसारच हे नूतनीकरण करण्यात आल्याचा दावा पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी केला आहे.
महाराजा आणि शीश महल
कोरोना महासाथीच्या काळात सर्व देश संकटात असताना आणि सर्व सार्वजनिक विकासकामे ठप्प असताना शासकीय निवासस्थानाचे नूतनीकरण करून घेणाऱ्या केजरीवाल यांची तुलना भाजपाने महाराजाबरोबर केली आहे तर, उंची बांधकाम साहित्य आणि सजावटीमुळे नव्या मुख्यमंत्री निवासस्थानाला शीश महल म्हणून संबोधण्यात आले आहे.
काँग्रेसनेही ओढली भाजपाची री
जनसेवक म्हणून केजरीवाल यांना आपल्या शासकीय निवासस्थानासाठी आलिशान सुखसुविधांवर कोट्यावधींचा सार्वजनिक निधी खर्च करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात व्हिएतनामचे मार्बल, खर्चिक पडदे आणि गालिचे अशा बरेच गावाची काय आवश्यकता, असा प्रश्नही त्यांनी केला. सार्वजनिक निधीचा गैरवापर करणाऱ्या केजरीवाल्यांना आपल्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही माकन यांनी नमूद केले.