- राज्य
- वाल्मिक कराडची दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात धाव
वाल्मिक कराडची दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात धाव
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोषमुक्त करण्यात यावे, ही वाल्मिक कराडची मागणी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तशी याचिका त्याने आपल्या वकिलांमार्फत दाखल केली आहे.
यापूर्वी विशेष न्यायालयाने कराड याची दोषमुक्तीची मागणी फेटाळून लावली आहे. कराड हाच देशमुख यांच्या अपहरण आणि हत्याप्रकरणी सूत्रधार आहे. तो गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या आहे. पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागण्यात संतोष देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
कराड याच्यावर मागील १० वर्षात गंभीर स्वरूपाचे २० गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ७ गुन्हे मागील ५ वर्षात दाखल करण्यात आले आहेत. अशी निरीक्षणे नोंदवत मोका न्यायालयाने कराड याला दोषमुक्त करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
या पार्श्वभूमीवर कराड याने देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्त होण्यासाठी धडपड सुरूच ठेवली आहे. मोक्का विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.