- राज्य
- मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम
मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम
महापालिकेकडून सुमारे दोन कोटीची दंडवसुली
मुंबई: प्रतिनिधी
मराठी देवनागरी लिपीत पाट्या नसणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून दोन कोटी रकमेची दंडवसुली करण्यात आली आहे. अनेक दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.हिंदी सक्ती वादातून वातावरण तापल्यानंतर या कारवायांना गती आली आहे.
दुकानांवर स्थानिक भाषेत पाट्या असणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिवार्य आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम २०१८ आणि सुधारणा अधिनियम २०२२ मध्ये देखील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची स्पष्ट तरतूद आहे. मात्र, महापालिया प्रशासनाकडून आतापर्यंत या बाबतीत काहीसे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, हिंदी सक्ती विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वातावरण तापवले गेल्यावर या संबंधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
दुकानांच्या पाट्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयात ६० जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाकडून रोज ३ हजार दुकानांच्या पाट्यांची तपासणी करण्याचे नियोजन. आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात ९ लाख दुकाने व आस्थापना आहेत. आतापर्यंत दीड लाख पेक्षा अधिक दुकानांच्या पाट्यांची तपासणी करण्यात आली आहे.
पुराव्यासाठी पाट्यांची छायाचित्र घेण्यात आली असून मराठीत ठळक पाट्या नसणाऱ्या दुकानांवर नोटीस बजावली जात आहे. या मोहिमेत आतापर्यंत १ कोटी ९८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दंड न भरणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाईची तरतूदही नियमात आहे. काही दुकानदार दंडाच्या रकमेबाबत आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांच्यावरील दंडाची रक्कम न्यायालय निश्चित करणार आहे.