- राज्य
- 'भामट्या भावां’ना राज्य सरकारकडून नोटीसा
'भामट्या भावां’ना राज्य सरकारकडून नोटीसा
लाडकी बहीण योजनेत लाटलेले पैसे परत करण्याचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पैसे लाटलेल्या 'भामट्या भावां'नी ते पैसे एक महिन्यात परत करावे, यासाठी राज्य सरकारकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हे पैसे परत न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ महिलांसाठीची योजना असून देखील या योजनेअंतर्गत तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे उघडतील आले आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
आता या भामट्या भावांकडून लाडकी बहीण योजनेतील पैसे परत मिळवण्यासाठी सरकारने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या योजनेअंतर्गत पुरुषांनी आत्तापर्यंत 21 कोटी 44 लाख रुपये लाटल्याचे उघड झाले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे उघडकीला आले आहे. शासकीय नोकरीत असलेल्या महिला तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या योजनेसाठी आलेल्या अर्जांची पुनर्तपासणी करण्याचे काम सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने हाती घेतले आहे. या फेरतपासणीमध्ये 14 हजार पुरुषांच्या बँक खात्यात या योजनेचा निधी गेल्याचे उघड झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेतून पुरुषांच्या बँक खात्यात पैसे गेलेच कसे? अर्जांची छाननी करतानाच हे अर्ज बाद कसे झाले नाहीत? या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरण्यात आले, या सर्व बाबींची कसून चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.