- राज्य
- निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ: संजय राऊत
निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ: संजय राऊत
शिवसेना ठाकरे गटाचे राज्यभर जन आक्रोश आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी
निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ असून सत्ताधाऱ्यांचा हस्तक आणि प्रवक्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाने मतांवर घातलेल्या दरोड्यातील लाभार्थी आहेत, असे आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.
देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोटाळे असल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका मतदार संघाच्या मतदार यादीचे विश्लेषण करून या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकपासून बिहारपर्यंत मतदार यादीतील घोटाळे उघड झाले आहेत. ईव्हीएम संदर्भात संशय आहे. त्याबद्दल जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, असे राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात आम्ही निवडणूक आयोगाला पुरावे दिले. त्याबद्दल त्यांनी काहीही केले नाही. त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना हे नाव व निवडणूक चिन्ह गद्दारांच्या हाती दिले ते आम्ही बघितले आहे. निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही. तो भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाने मतांवर घातलेल्या दरोड्यातील लाभार्थी आहेत. त्यामुळे ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत, असा आरोप देखील राऊत यांनी केला.