- राज्य
- 'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात'
'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात'
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावर प्रा लक्ष्मण हाके यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी
गावागावात आता सगळ्यांनीच इतर मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे, अशी टीका इतर मागासवर्गीय समाजाचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. हेच ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आता टगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे खऱ्या ओबीसींनी जागरूक राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील प्रा हाके यांनी कठोर टीका केली आहे. जरांगे हा लबाड कोल्हा आहे. त्यामुळे ओबीसींनी ताठ मानेने पुढे येणे आवश्यक आहे. ओबीसी समाज शांत आहे याचा अर्थ ओबीसींचा आवाज दबला आहे, असे सत्ताधाऱ्यांनी अथवा विरोधकांनीही समजू नये. ओबीसी समाजातील युवक सर्व काही जाणतो, असेही ते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी कितीही माणसं गोळा करू देत. आम्ही सर्व शांतपणे पहात आहोत. मात्र, लवकरच संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाची ताकद सर्वांनाच दाखवून देऊ, असा इशाराही प्रा. हाके यांनी दिला. सत्ताधाऱ्यांनी देखील विनाकारण ओबीसी समाजाचा पुळका आल्याचा आणू नये. त्यांनी समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावे. अन्यथा त्यांना देखील समाज योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला दिलेले आरक्षण संपवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाने सावध राहण्याची गरज आहे. तुमचेच आरक्षण घेऊन हे टगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशी टीका प्रा हाके यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यापूर्वी केलेल्या काळ्या कृत्यांची उपरती म्हणून नागपूर मधून मंडल यात्रा काढली आहे, असेही ते म्हणाले.