- राज्य
- 'महिलांचे सक्षमीकरण राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक'
'महिलांचे सक्षमीकरण राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक'
तरसंगचालक मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण विधान
सोलापूर: प्रतिनिधी
महिला अधिकाधिक सक्षम होणे राष्ट्राच्या उन्नतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिलांना धाकात न ठेवता त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मुक्त वाव द्या, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योग वर्धिनी या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात भागवत बोलत होते.
पुरुष महिलांना धाकात ठेवू शकतो. धाकाने चांगल्या सवयी लावू शकतो. मात्र, त्या कायम ठेवायच्या असतील, महिलांच्या कर्तृत्वाला वाव देऊन त्यांना सक्षम बनवायचे असेल तर त्यांना रूढी परंपरांच्या जोखडातून बाहेर काढून मुक्त वाव देणे आवश्यक आहे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
देशाचे भाग्य बदलण्यासाठी सर्व 142 कोटी नागरिक एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने देशाचा विकास व्हायचा असेल तर महिला हा घटक उभा राहणे आवश्यक आहे. एखादा पुरुष हा एकटाच काम करतो. मात्र, एखादी महिला काम करते त्यावेळी संपूर्ण कुटुंबाचा उत्कर्ष होतो, असेही भागवत यांनी नमूद केले.
जगात वाईट गोष्टी अस्तित्वात असल्या तरी देखील त्याहून 40 पट अधिक चांगल्या गोष्टी अस्तित्वात असतात. त्यामुळे चिंता न करता चांगल्या गोष्टींचा विचार करून चांगली कामे करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. झाडापासून बीज उत्पन्न होते आणि बीजापासून पुन्हा झाड उत्पन्न होते त्याप्रमाणे एका चांगल्या कामातून अनेक चांगली कामे उभी राहतात, असे भागवत म्हणाले.
स्वार्थ किंवा अहंकारातून सुरू झालेली कामे स्वार्थ साधन यानंतर अथवा संबंधित व्यक्ती गेल्यानंतर बंद पडतात. मात्र, करुणा आणि कळवळा यांच्या प्रेरणेने सुरू झालेली कामे चिरकाल टिकतात. चांगल्या माणसांचा समाज नेहमी संघटित आणि समाधानी असतो. आपल्याला संपूर्ण समाजाची एकजूट करून गतवैभव पुन्हा प्राप्त करायचे आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले.
तब्बल 40 वर्ष काम करून देखील तुम्हाला काहीच मिळत नाही. तरीही तुमचे कार्य सुरूच आहे. या मागची प्रेरणा काय, असा प्रश्न जयप्रकाश नारायण यांनी संघाच्या एका बैठकीत विचारला होता. त्यावर उत्तर देताना एक स्वयंसेवक म्हणाला की, समाजातील दुःख हीच आमची प्रेरणा आहे. ती जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आमचे कार्य सुरूच राहणार आहे. हीच संघ कर्याची प्रेरणा असल्याचे भागवत यांनी नमूद केले.