- राज्य
- 'व्हॉट्स ॲपवर दिलेला त्रास हे देखील रॅगिंगच!'
'व्हॉट्स ॲपवर दिलेला त्रास हे देखील रॅगिंगच!'
विद्यापीठ अनुदान आयोगाची उच्च शिक्षण संस्थांना तंबी
मुंबई: प्रतिनिधी
वरिष्ठ विद्यार्थ्याकडून कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वरूपाचा त्रास याला रॅगिंग म्हटले जाते. व्हॉट्स ॲप मेसेजेस आणि ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या त्रासालाही रॅगिंग समजले जाईल. याला आळा घालण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी सतर्क रहावे, अशी तंबी विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे.
आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असे खास ज्युनिअर्सना त्रास देण्यासाठी, रॅगिंग करण्यासाठी व्हॉट्स ॲप ग्रुप्स कार्यरत आहेत का, याची काटेकोर माहिती शिक्षण संस्थांनी वारंवार घ्यावी. विद्यार्थ्यांकडून तक्रार आल्यास त्याची त्वरित दखल घ्यावी. अन्यथा अशा शिक्षण संस्थांचे अनुदान थांबवणे बरोबरच आणखीही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अनुदान आयोगाने दिला आहे.
दरवर्षी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगच्या शेकडो तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाला प्राप्त होत असतात. उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे संवादाची आधुनिक साधने प्राप्त होत असतानाच त्याचा वापर रॅगिंग सारख्या वाईट गोष्टींसाठीही करण्याचे प्रमाण वाढत आहे. व्हॉट्स ॲपद्वारे कनिष्ठ विद्यार्थ्यांना अपमानास्पद मेसेज, छायाचित्र पाठवणे, विनोद पाठवणे, धमक्या देणे, ट्रोल करणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने हे पाऊल उचलले आहे.