- राज्य
- 'संभाव्य युतीबाबत विधाने करण्यापूर्वी परवानगी घ्या'
'संभाव्य युतीबाबत विधाने करण्यापूर्वी परवानगी घ्या'
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सावध पवित्रा
मुंबई: प्रतिनिधी
मराठी विजय मेळव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीबाबत स्पष्ट संकेत दिले असले तरी देखील खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा याबाबत सावध पवित्रा असल्याचे दिसून येत आहे. तशातच आता राज ठाकरे यांनी, संभाव्य युतीबाबत कोणतेही विधान करताना आपली परवानगी घ्यावी, असे आदेश आपल्या नेत्या, कार्यकर्त्यांना दिले आहेत.
विजय मेळाव्यात बोलताना राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये मोठा फरक दिसून आला आहे. राज ठाकरे यांनी राजकारणाबद्दल फारसे काही न बोलता मराठीच्या मुद्द्याची मुद्देसूद मांडणी केली तर उद्धव ठाकरे यांनी, आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहू. आम्हाला वापरून फेकून देणाऱ्यांना दोघे मिळून फेकून देऊ, असे विधान करीत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या मेळाव्यात संपूर्ण ठाकरे कुटुंब एका मंचावर दिसले. ठाकरे बंधूंनी अगत्याने एकमेकांना मिठी मारली. त्यामुळे हा मेळावा म्हणजे संभाव्य युतीची निश्चिती असल्याची चर्चा सुरू झाली. राज ठाकरे मात्र सुरुवातीपासूनच सावध विधाने करीत होते. हा मेळावा राजकीय स्वरूपाचा नाही. "नाही कुठल्या पक्षाचा झेंडा, मराठी हा एकच अजेंडा," हे त्यांनी वारंवार सांगितले.
हा मेळावा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. संभाव्य युतीबाबत कोणतेही भाष्य करण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क करून त्याबाबत पूर्वपरवानगी घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठी विजय मेळावा ही शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची पायाभरणी होती की नाही, याबद्दल राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.