- राज्य
- अब्जावधीच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद
अब्जावधीच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद
पाषाण येथे सीआयडीने केली अटक
पुणे: प्रतिनिधी
अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या कुटे उद्योग समूहाच्या प्रमुख अर्चना कुटे यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाषाण येथे अटक केली आहे. त्यांच्याबरोबर घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणखी एका महिलेलाही जेरबंद करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर आयकर चुकवल्याबद्दल कुटे उद्योगसमूहाच्या सर्व आस्थापनांवर आयकर विभागाने मागील वर्षी छापे घातले होते. त्यानंतर आयकर विभागाने त्यांची सर्व कार्यालय सीलबंद केली. त्यामुळे ज्ञानधारा मल्टीस्टेट मधील गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडले. त्याबद्दल सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि संपूर्ण संचालक मंडळावर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये हडप करून मागील दीड वर्ष अर्चना या फरारी होत्या. त्यांचे पती सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदकर यांना मागील वर्षी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीं बरोबरच अर्चना यादेखील बीडच्या पोलीस मुख्यालयात आल्या होत्या. मात्र, तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्यांना पाठीशी घातले. त्यामुळेच त्या पुणे, मुंबई, महाबळेश्वर अशा ठिकाणी निर्धास्त फिरत राहिल्या.
अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काल रात्री उशिरा पुण्यातील पाषाण येथून अर्चना यांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबरच आशिष पाटोदकर यांच्या आईंना देखील पोलिसांनी अटक केली आहे.