- राज्य
- मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी
मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी
पोलिसांनी ओबीसी आंदोलकांना घेतले ताब्यात
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून इतर मागासवर्गीय आंदोलकांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दूर नेले.
मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देणे सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करून राज्यभरात ठिकठिकाणी ओबीसी नेते कार्यकर्ते आंदोलने करीत आहेत.
या आंदोलनाचा भाग म्हणून ओबीसी आंदोलकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणा दिल्या. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. मात्र, त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये, अशी आंदोलकांची मागणी आहे. या पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे.
दरम्यान, ओबीसींसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या कक्षात नुकतीच पार पडली. या बैठकीला इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, गणेश नाईक व दत्ता भरणे उपस्थित होते. यावेळी बोगस जात प्रमाणपत्राला आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे ओबीसी समाजासाठी 2 हजार 933 कोटी रुपयांचा निधी पंधरा दिवसाच्या आत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.