- राज्य
- भंते विनाचार्य यांची धम्मयात्रा पुण्यात: बोपोडीत जंगी स्वागत
भंते विनाचार्य यांची धम्मयात्रा पुण्यात: बोपोडीत जंगी स्वागत
महाबोधी विहाराच्या ताब्याच्या मागणीसाठी यात्रेचे आयोजन
पुणे: प्रतिनिधी
महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी देशभरात धम्म यात्रा काढणारे आदरणीय भंते विनाचार्य यांनी आज पुणे शहरात धम्म यात्रेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या यात्रेचे बोपोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावर आगमन झाल्यावर माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर आणि बोपोडी येथील बौद्ध बांधवांनी जल्लोषात स्वागत केले.
यावेळी भंते विनाचार्य म्हणाले, "बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. तथागत गौतम बुद्धांना तेथेच बुद्धत्व प्राप्त झाले. हा ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा, ही आमची न्याय मागणी आहे. १९४९ साली बिहार सरकारने तयार केलेला कायदा रद्द करून, विहाराचा ताबा बौद्धांना देण्यात यावा."
त्यांनी भारतातील सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांना या मागणीस पाठिंबा देण्याचे आवाहन केले. "जर लवकरात लवकर हे विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात आले नाही, तर देशव्यापी आंदोलन छेडावे लागेल," असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी भंते नागघोष, भंते धम्मानंद तसेच बौद्धगया येथून आलेले अनेक भंते उपस्थित होते. कार्यक्रमात परशुराम वाडेकर यांनी भंते विनाचार्य यांचा सत्कार केला आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.
परशुराम वाडेकर म्हणाले, "पुणे शहरात यापूर्वी आम्ही बालगंधर्व-डेक्कन चौकात हजारो बौद्ध बांधवांसह रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला होता. भंते विनाचार्य यांनी वेळ दिल्यास, पुण्यात मोठ्या सभेचे आयोजन करण्यास आम्ही सर्व तयार आहोत."
धम्म यात्रेच्या स्वागतासाठी बोपोडीतील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि श्रद्धेने भरलेले होते.