- राज्य
- मतदार व मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, कॉन्ट्रॅक्ट किंवा...
मतदार व मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, कॉन्ट्रॅक्ट किंवा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप आमदारांना तंबी
मुंबई: प्रतिनिधी
आपल्या पक्षाची संस्कृती वेगळी आहे. केवळ मतदार आणि मतदारसघाच्या हिताचा विचार करा. कॉन्ट्रॅक्ट किंवा टेंडरच्या भानगडीत पडू नका, अशी स्पष्ट तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिली आहे.
पक्षाच्या आमदारांना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदारांना अत्यंत स्पष्ट शब्दात काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच आहेत. मतदारांचे भले कशात आहे याचा विचार करूनच कामे हाती घेतली पाहिजे. आमदार निधीचा योग्य वापर करा. राज्यासमोर असलेल्या आर्थिक आव्हानांचा परिणाम विकास कामांवर होणार नाही, याबद्दल योग्य काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
सध्या इतर अनेक पक्षातील लोक भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. मात्र, त्यापैकी काही जणना पक्षातूनच विरोधाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, सध्या पक्षात येणाऱ्या बाहेरच्या लोकांमुळे पक्षाचा फायदाच होणार आहे. त्यामुळे त्याला विरोध करू नका. तुमच्या मतदारसंघात तुमचा आणि पक्ष संघटनेचा शब्द अंतिम राहील, असे देखील त्यांनी आमदारांसमोर स्पष्ट केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, कामे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करा, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.