- राज्य
- 'संग्राम जगताप यांना विचारणार जाब'
'संग्राम जगताप यांना विचारणार जाब'
अजित पवार यांचा सलीम सारंग यांना शब्द
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कोणत्याही धर्माविरोधात बोलणे पक्षाच्या तत्त्वधारेच्या विरोधात आहे. संग्राम जगताप यांनी नेमकं काय आणि का बोललं, हे मी त्यांच्याकडून विचारणार आहे."
या वक्तव्यानंतर सलीम सारंग यांच्या मागणीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी सलीम सारंग यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सलीम सारंग यांचे कौतुक केले असून, त्यांना समाजाच्या न्यायासाठी उभा राहणारा खरा नेता म्हणून गौरवले आहे. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पक्षामध्ये निर्माण झालेला अंतर्गत मतभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, आता संग्राम जगताप यांच्यावर पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.