- राज्य
- 'मुंबई महापालिका आपली होती आणि आपलीच राहील'
'मुंबई महापालिका आपली होती आणि आपलीच राहील'
उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महापालिका शिवसेनेची होती आणि ती आपल्या शिवसेने कडेच राहील, असा ठाम विश्वास ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. चोरून सत्ता हस्तगत केलेल्यांकडून न्यायाची अपेक्षा बाळगू नका, असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधींच्या बैठकीत ठाकरे बोलत होते.
मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी महापालिकेची सत्ता ठाकरे गटाकडून हिसकावून घेण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीनंतरही महापालिका आपल्याकडेच राहील, असा विश्वास थक्रे यांनी व्यक्त केला आहे.
... तोपर्यंत दंड भरणार नाही हे ठणकावून सांगा
रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबईपासून कोकणापर्यंत रस्त्यात असलेले खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवर केलेल्या दंडाची रक्कम भरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठणकावून सांगा, असे ठाकरे यांनी सांगितले. जनता तुमचा बाप आहे आणि हा जनतेचा पैसा आहे, असेही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.
टॉवररुपी राक्षसांनी गिळली मंडपांची जागा
मुंबईत भल्यामोठ्या टॉवररुपी राक्षसांनी मंडपाची जागा गिळून टाकली आहे. त्यामुळे मंडप उभारणार कुठे आणि सण साजरे करणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. आमच्या सण-उत्सवांवर बंधने आणाल तर आम्ही ती तोडून टाकू, असा इशारा देतानाच ठाकरे यांनी गणपती बाप्पा आपल्याकडे पहात आहे, याची जाणीव ठेवून सण साजरे केल्यास मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, असेही नमूद केले.
अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांचा भाषेशी काय संबंध?
पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकण्याची सक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला आपण कडाडून विरोध केला. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर सरकारने भाषेच्या शिक्षणाविषयी धोरण निश्चित करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीचे नेतृत्व अर्थतज्ञ नरेंद्र जाधव करीत आहेत. वास्तविक नरेंद्र जाधव यांचा भाषेशी काय संबंध, असा सवालही ठाकरे यांनी केला.
.