- राज्य
- 'आधी आपला पक्ष सांभाळा, आम्हाला फुकट सल्ले देऊ नका'
'आधी आपला पक्ष सांभाळा, आम्हाला फुकट सल्ले देऊ नका'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोहित पवार यांना टोला
कोल्हापूर: प्रतिनिधी
काही जणांना आपण मोठे नेते झालो असा भ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळावा. आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नये, असा टोला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संस्थान पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना लगावला.
अजित पवार यांचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यांच्या पक्षात दोन गट आहेत. त्यांच्यापैकी एक भारतीय जनता पक्षाचे प्रेम असलेला गट सातत्याने अजित पवार यांना बदनाम करण्याची कारस्थाने करत असतो. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून अजित पवार यांनी पद काढून घेतलेल्या सूरज चव्हाण यांना पवार यांच्या अपरोक्ष अधिक मोठे पद देणे, हा त्याचाच एक भाग आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
आमचा पक्ष कसा चालवायचा याचे फुकटचे सल्ले आम्हाला कोणी देण्याची गरज नाही. काही जणांची, आपण मोठे नेते झालो आहोत, अशी समजूत झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा मक्ता आपल्याकडेच असल्याचे त्यांना वाटते. त्यांनाही बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. आमच्या पक्षात नाक खुपसू नये, असे पवार म्हणाले.