- राज्य
- दिव्या देशमुख हिचे नागपुरात उत्स्फूर्त स्वागत
दिव्या देशमुख हिचे नागपुरात उत्स्फूर्त स्वागत
बुद्धिबळ प्रेमी नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग
नागपूर: प्रतिनिधी
महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून भारतात परतलेल्या दिव्या देशमुख हिचे नागपुरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तिचे स्वागत करण्यासाठी बुद्धिबळप्रेमी नागरिकांसह शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दिव्या देशमुख ने अवघ्या 19 व्या वर्षी अनुभवी खेळाडूचा पराभव करत महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकण्याबरोबरच ग्रँडमास्टर किताब प्राप्त करण्याची कामगिरी केली. महाराष्ट्राची, विदर्भाची कन्या असलेल्या दिव्याने प्राप्त केलेल्या विश्वविजयाचा उत्सव नागपूरकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
नागपूर विमानतळावर दिव्याचे पुष्पगुच्छ देऊन आणि हार घालून स्वागत करण्यात आले. या मोठ्या यशाबद्दल दिव्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनीही मोठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे तिच्यासोबत छायाचित्र घेण्यासाठी अनेक चाहते, विशेषतः विद्यार्थीवर्ग उत्सुक होता.
आपल्या स्वागतासाठी जमलेली गर्दी पाहून दिव्याने आनंद व्यक्त केला. तिने या यशाचे श्रेय तिची बहीण, कुटुंब आणि पहिले प्रशिक्षक राहुल जोशी यांना दिले.
नागपूरकरांच्या वतीने दिव्याचा सत्कार २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला जाणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी अकरा वाजता सुरेश भट सभागृहात होणार आहे.