- राज्य
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्या असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काही शिजते आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मात्र पक्षाच्या खासदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय काल अचानक दिल्ली गाठली. राज्यात काही मंत्र्यांच्या गैरवर्तनामुळे आणि त्यांच्यावरील कारवाईसाठी वाढत चाललेल्या दबावामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काल रात्री शिंदे यांनी एका बड्या नेत्याची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीला जाताना शिंदे यांनी आपले अधिकृत वाहन न वापरता गाडी बदलून ते गेल्याचेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते उदय सामंत यांनी मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने पक्षाच्या खासदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले, असे स्पष्टीकरण दिले आहे.