- राज्य
- 'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'
'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'
राजकारण्यांनी बनवलेले मिथक असल्याचा माजी एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे यांचा दावा
पुणे: प्रतिनिधी
भगवा अथवा कट्टर उजव्या विचारसरणीचा दहशतवाद अशी कोणतीही बाब अधिकृतरित्या अस्तित्वात नसल्याचे स्पष्टीकरण दहशतवाद विरोधी पथक, पश्चिम महाराष्ट्रचे माजी प्रमुख, माजी पोलीस सहाय्यक आयुक्त भानुपताप बर्गे यांनी 'दि डेमोक्रॅट'शी बोलताना स्पष्ट केले.
मालेगाव शहरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल देताना न्यायालयाने भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि तत्कालीन लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष मुक्ताचा दिली आहे. आरोपींवर तपास यंत्रणामार्फत करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यास सरकारी वकील यशस्वी ठरले नसल्याची टिपणीही राष्ट्रीय तपास यंत्रणा विशेष न्यायालयाने केली आहे.
या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे देशात नक्षलवाद व मुस्लिम दहशतवाद अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा भगवा अथवा उजवा दहशतवाद अस्तित्वात असल्याचा दावा या खटल्याच्या आधारे अधोरेखित करण्यात आला. केंद्रीय संरक्षण मंत्री सुशील कुमार शिंदे आणि पी चिदंबरम यांनी भगव्या दहशतवादाला दुजोरा दिला. मात्र, ज्याप्रमाणे नक्षलवाद, शरीयत कायद्याप्रमाणे जग चालवण्याची मनीषा बाळगणारा दहशतवाद सुनियोजित आणि संघटितपणे कार्यरत आहे त्याप्रमाणे कट्टर उजवा दहशतवाद अथवा भगवा दहशतवाद अस्तित्वात असल्याचा कोणताही दाखला मिळत नसल्याचे बर्गे यांनी स्पष्ट केले.
राजकारणी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी अनेक मिथके पसरवत असतात. त्यासाठी समाजात फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याच्या परिणामांची फिकीर राजकारण्यांकडून केली जात नाही. भगवा अथवा उजवा दहशतवाद हे त्याचेच उदाहरण असल्याचा दावा बर्गे यांनी केला.
राजकारणी आपले मत जनतेमध्ये पसरविण्यासाठी अथवा तत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही विधाने करीत असतात. भगवा दहशतवाद अथवा कट्टर उजव्या दहशतवादाचे विधान हे त्यापैकीच एक असू शकते, असे बर्गे यांनी नमूद केले.
मुंबई पश्चिम लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट अथवा मालेगाव बॉम्बस्फोट या खटल्यातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याबद्दल बर्गे यांना तपास यंत्रणांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव असल्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, तपास यंत्रणा कायमच परस्पर समन्वयानेच कामकाज करीत असतात. मात्र, तपासात काही त्रुटी राहू शकतात. मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तपास यत्रणांनी केलेला तपास खालच्या न्यायालयाने मान्य केला आणि आरोपींना शिक्षा सुनावली. मात्र, उच्च न्यायालयाला तो पटला नाही. सर्वोच्च न्यायालय याबाबत आणखी वेगळा विचार करू शकते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात देखील राष्ट्रीय तपास यंत्रणा विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिल्यानंतर वेगळा निष्कर्ष असू शकतो. मात्र, या प्रकरणामुळे पसरविण्यात आलेले भगव्या दहशतवालाचे भय अस्तित्वात असल्याचा कोणताही निष्कर्ष कोणत्याही तपास यंत्रणेला आढळून आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.