- राज्य
- महादेवी हत्तीण परत आणण्याच्या मागणीसाठी जनचळवळ
महादेवी हत्तीण परत आणण्याच्या मागणीसाठी जनचळवळ
रिलायन्स उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा नागरिकांचा निर्णय
कोल्हापूर: प्रतिनिधी
नांदणी मठातून गुजरातमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलांची हौस भगविण्यासाठी उभारलेल्या वनतारा प्राणी प्रकल्पात रवाना करण्यात आलेल्या महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात पाठवण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाभरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लोक चळवळ सुरू केली आहे. त्यातच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी देखील या चळवळीच्या रिंगणात उतरले आहेत.
महादेवीला पुन्हा मठात आणावे, अशा निवेदनावर सह्यांची मोहीम कांग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते सतेज पाटील यांनी हाती घेतली असून नागरिकांकडून केला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी देखील या प्रश्नावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले आहे.
भटक्या कुत्र्यांना नेता का?
आमच्याकडे गावागावात शेकडो भटकी कुत्री हिंडत आहेत. त्यांची अवस्था वाईट आहे. त्या कुत्र्यांची रवानगी वनतारामध्ये करण्यात येऊ शकते का, हे पहावे. आम्ही त्यांना मदत करू, अशा शेलक्या शब्दात खासदार माने यांनी महादेवीला वनातारामध्ये पाठवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
पूर्व इतिहास दडवला जातो
प्राण्यांच्या बाबतीत वनविभागाचा पूर्वेतिहास चांगला नाही. ज्योतिबा देवस्थानातील हत्तीला देखील अशाच प्रकारे घेऊन जाण्यात आले होते. मात्र, तीनच वर्षात त्या हत्तीचा आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या माहुताचा देखील मृत्यू झाला, ही बाब कधीही सांगितली गेली नाही, असे सांगत आमदार विनय कोरे यांनी महादेवीला वनतारामध्ये पाठविण्याच्या निर्णयावर टीका केली.
हजारो जिओ कार्ड झाली पोर्ट
महादेवी हत्तीणला वनतारा येथे घेऊन जाण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शिराळा तालुक्यातील नागरिकांनी रिलायन्सच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो मोबाईल धारकांनी आपली मोबाईल सेवा दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट केली आहे.
नांदणी मठात हत्तीण ठेवण्यास प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेने आक्षेप घेतला. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला न्यायालयाने महादेवीची पाठवणी वनिता प्राणी केंद्रात करण्याचा आदेश दिला. मात्र, तिला घेऊन जाण्यासाठी पोहोचलेल्या पथकाला गावकऱ्यांनी विरोध केला. त्यासाठी हजारो गावकरी रस्त्यावर उतरले. पथकाच्या गाडीवर दगडफेकही केली. अखेर कायद्याचा बडगा दाखवत महादेवीला ताब्यात घेण्यात आले. तिला निरोप देण्यासाठी हजारो गावकरी जमा झाले होते. त्यांचे डोळे पाणावलेल होते. महादेवीने देखील साश्रू नयनांनी सोंड उंचावत नांदणीकरांना निरोप दिला.