- राज्य
- शनि शिंगणापूर गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचारी जाळ्यात
शनि शिंगणापूर गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचारी जाळ्यात
पाच मोबाईल ॲप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून लाटले पैसे
शनि शिंगणापूर: प्रतिनिधी
शनि शिंगणापूर देवस्थानच्या नावाखाली कोट्यावधी रुपये लाटणाऱ्या गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात अवैधरित्या पैसे जमा झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करीत असून त्यांची नावे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
देवस्थानात देणगी, पूजा, अभिषेक, तेल अर्पण याच्या नावाखाली पाच मोबाईल ॲप्स आणि वेबसाइट्स च्या माध्यमातून देवस्थानच्या अधिकृत परवानगीशिवाय भाविकांकडून ऑनलाईन पैसे जमा करण्यात येत होते. ॲप्स आणि वेबसाईट चालवणाऱ्या कंपनीकडून हे पैसे थोड्या थोड्या प्रमाणात नियमितपणे दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले ही बाब उघडकीला आली आहे. एकूण एक कोटीहून अधिक रक्कम या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
या गैर पकाराचा सूत्रधार कोण आहे, आपल्या बँक खात्यात जमा होणारे पैसे संबंधित कर्मचारी कोणा कोणाच्या खात्यात जमा करत होते किंवा रोख स्वरूपात देत होते, याचा कसून शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संबंधित मोबाईल ॲप आणि वेबसाईट चालवणाऱ्या कंपनीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.