- राज्य
- मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट
तब्बल महिनाभर पावसाने मारली दडी
लातूर: प्रतिनिधी
राज्याच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी देखील मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर लाखो एकर शेतीमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, मराठवाड्यात तब्बल 28 दिवसापासून पाऊस गायब आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 101.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे पर्जन्यमान मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल 188 मिलिमीटरने कमी आहे. हीच परिस्थिती धाराशिव, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या विश्वासावर शेतात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात विशेषत: सोयाबीनच्या पिकाची मॉन्सूनच्या हंगामात लागवड केली जाते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या केल्या आहेत. जमिनीतून कोवळी रोपे उगवून आलेली असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे कोवळी रोपे पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पेरलेले पीक वाया जाऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. एक एकरात सोयाबीनची लागवड करण्यासाठी तब्बल दहा ते बारा हजार रुपये खर्च करावा लागतो. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्याला पुन्हा एकदा एवढा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.