- राज्य
- मावळ तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ११० नवीन लाभार्थ्यांना आदेश, १२७ कुटुंबांना चाव्यां...
मावळ तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ११० नवीन लाभार्थ्यांना आदेश, १२७ कुटुंबांना चाव्यांचे वितरण
गरजूंचे घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा गौरव
मावळ तालुक्यात प्रधानमंत्री जन मन घरकुल योजनेअंतर्गत २५९ आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२२ लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर घरकुल बांधणीसाठी ७/१२ उतारे वाटप करण्यात आले
वडगाव मावळ,/प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नव्याने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आदेश वाटप, तसेच पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट वाटपाचा भव्य सोहळा आज (सोमवारी), वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि मोठ्या थाटात पार पडला.
ही योजना म्हणजे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसून, गरजू कुटुंबांच्या घरस्वप्नांची पूर्ती करणारा आश्वासक उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. आपल्या स्वतःच्या घराची चावी हाती घेताच अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य व डोळ्यांतून अश्रू ओघळताना दिसून आले. काही लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत होतो, मात्र आज शासनाच्या या योजनांमुळे आमचं आयुष्यच पालटलं आहे.”
'मावळ पॅटर्न' जिल्ह्यासाठी आदर्श ठरावा – जिल्हाधिकारी डुडी
या कार्यक्रमात उपस्थित जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटले की, *“या योजनेचा आदर्श ‘मावळ पॅटर्न’ आपण मावळात बनवूयात व त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करूयात,”* असे आवाहन त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केले.
११० नवीन लाभार्थ्यांना आदेश, १२७ कुटुंबांना चाव्यांचे वितरण
या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६६, रमाई आवास योजना अंतर्गत ३४ आणि यशवंत आवास योजना (ठाकर समाज) अंतर्गत १० अशा एकूण ११० नव्या लाभार्थ्यांना घरकुल आदेश देण्यात आले. याशिवाय, आतापर्यंत १२७ लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट्स देण्यात आल्या.
गायरान व खाजगी जमिनींवर घरकुलासाठी जागा वाटप
या कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीच्या वाटपाचा होता. मावळ तालुक्यात प्रधानमंत्री जन मन घरकुल योजनेअंतर्गत २५९ आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२२ लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर घरकुल बांधणीसाठी ७/१२ उतारे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कोटमवाडी येथील काही लाभार्थ्यांना वनविभागातून तर शिवली, कुणे नामे व ओव्हळे गावांतील लाभार्थ्यांना खाजगी जमीन मालकांनी सामाजिक जाणिवेतून बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामपंचायती, प्रशासन, पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास अधिकारी व घरकुल प्रकल्प विभाग यांनी समन्वय साधून भरीव कामगिरी बजावली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, प्रकल्प संचालक शालिनी कडू, तहसिलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्यासह मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, सरपंच, पंचायत सदस्य व लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांची मोठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाने मावळ तालुक्यातील शेकडो कुटुंबांना नवजीवन देत, ‘घरकुल’ हे केवळ बांधकाम नसून समाजासाठीचा एक सकारात्मक बदल आहे, हे अधोरेखित केले.
About The Author
