- राज्य
- '... विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही'
'... विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही'
विधानभवनातील राडेबाजी वर संतापले राज ठाकरे
मुंबई :प्रतिनिधी
विधानभवनातील राडेबाजीचे प्रकार वेळीच दखल घेऊन थांबवले नाहीत तर भविष्यात हेच प्रमाण मानून आमदारांचे खून पडले तर आश्चर्य वाटायला नको, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानभवनातील हाणामारीच्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
गुरुवारी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारात सराईत गुन्हेगारांचा सहभाग होता, असा आरोप केला जात आहे.
सत्ता हे साध्य नव्हे तर साधन...
सध्याच्या राज्यकर्त्यांना सत्ता हे साध्य नसून साधन असल्याचा विसर पडला आहे. त्यामुळे उठ सूट कोणालाही पक्षात प्रवेश दिला जात आहे. मग त्यांचा उपयोग विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी केला जातो. हे सगळे करतानाच दुसरीकडे साधनशुचितेच्या बाता मारायच्या, यातील भंपकपणा आता जनतेच्या लक्षात आला असेल, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी, हा महाराष्ट्र कोणाच्या हातात देऊन ठेवला आहे, असा सवालही केला.
... ते आता कुठे लपून बसले?
मराठी भाषेसाठी, मराठी माणसांच्या सन्मानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी कोणावर हात उचलला तर त्याच्यावर, माझ्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसले आहेत, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेला, मराठी माणसाच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माझा महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतो हे अभिमानास्पद आहे. कारण ते कृत्य कोणाच्याही व्यक्तिगत हेव्यदाव्यासाठी केलेले नसते.
थोडी साधनशुचिता शिल्लक असेल तर...
सत्ताधारी पक्षामध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर विधानभवनात राडा करणाऱ्या स्वतःच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून दाखवा. ती करता येत नसेल तर माझा महाराष्ट्र सैनिक जेव्हा मराठी द्वेष्ट्यांना सरळ करेल तेव्हा आम्हाला शहाणपणा शिकवायला येऊ नका, असेही ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.