- राज्य
- मुंबईत घर घेणे येणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात?
मुंबईत घर घेणे येणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात?
म्हाडाच्या घरांच्या किमती होणार दहा टक्क्याने कमी
मुंबई: प्रतिनिधी
मुंबईत जागांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे इथे घर घेणे सर्वसामान्यांसाठी दुरापास्त झाले आहे. मात्र, म्हाडाच्या घरांच्या किमतीमध्ये आठ ते दहा टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असून त्यामुळे मुंबईतील घराचे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
सामान्य ग्राहकांच्या स्वप्नांची पूर्ती व्हावी आणि महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळाला देखील तोटा होणार नाही, यासंबंधी धोरण निश्चित करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी म्हाडाने समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अभ्यास पूर्ण केला असून आठवड्याभरात समितीचा अहवाल महाडाच्या मुंबई विभागाच्या उपाध्यक्षांकडे सोपविला जाणार आहे.
एकीकडे केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणाबरोबरच जमिनीच्या आणि तयार सदनिकांच्या किमतींमध्ये देखील मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या म्हाडाने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मुंबईत घर घेणे शक्य व्हावे आणि म्हाडासाठी देखील हे प्रयत्न अव्यवहार्य ठरू नयेत, या उद्देशाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर म्हाडाच्या घरांच्या किमती लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहेत.