- राज्य
- सदनिकेच्या आकारानुसार केली जाणार देखभाल खर्चाची आकारणी
सदनिकेच्या आकारानुसार केली जाणार देखभाल खर्चाची आकारणी
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे: प्रतिनिधी
यापुढे इमारतीच्या देखभाल खर्चाची आकारणी सरसकट न करता सदनिकेच्या आकारानुसार करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पुण्यातील एका निवासी संकुलाच्या संदर्भातील देखभाल खर्चाच्या खटल्यात हा निकाल देण्यात आला आहे.
पुण्यातील एका निवासी संकुलात व्यवस्थापन मंडळाने सर्व सभासदांना सरसकट समान देखभाल खर्च (मेन्टेनन्स चार्जेस) आकारण्याचा निर्णय घेतला. छोट्या सजनीकाधारकांनी या निर्णयाला आक्षेप घेत सदनिकेच्या आकारानुसार देखभाल खर्चाची आकारणी करण्याबाबत आग्रह धरला. व्यवस्थापन मंडळाने देखील तो मान्य केला.
काही सदनिका धारकांनी या निर्णयाला आक्षेप घेत सहकार न्यायालयाकडे दाद मागितली. सहकार न्यायालयाने हा आक्षेप फेटाळून लावत सदनिकेच्या आकारानुसार देखभाल खर्च आकारण्याचा व्यवस्थापन मंडळाचा निर्णय कायम ठेवला. याचिकाकर्त्या सदनिका धारकांनी सहकार न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागितली.
मोठ्या आकाराच्या सदनिकांमध्ये अधिक लोक राहतात असे गृहीत धरून त्यांना अधिक देखभाल खर्चाची आकारणी करणे अन्यायकारक असल्याचा दावा याचि काकर्त्यांनी केला. त्याचप्रमाणे देखभाल खर्च हा सामायिक जागा आणि सुखसुविधा यासाठी आकारला जात असल्यामुळे त्याची समान आकारणी व्हावी, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून केला गेला.
याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद अमान्य करत उच्च न्यायालयाने कायदा आणि व्यवस्थापन मंडळाच्या निर्णयानुसार मोठ्या आकाराच्या सदनिका धारकांना अधिक देखभाल खर्च द्यावा लागेल, असा निर्णय दिला आहे.