- राज्य
- प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा
प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा
अमित ठाकरे यांना दिलेला शब्द पाळता आला नसल्याची व्यक्त केली खंत
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दोन भाऊ एकत्र आल्याचे या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. आता आपले इथे काही काम उरलेले नाही, याची जाणीव झाली. त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. केवळ युवा नेते अमित ठाकरे यांना दिलेला शब्द पाळू शकलो नाही, याचीच एक खंत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
छत्रपती संभाजीनगर येथे अमित ठाकरे यांना आपण तुमच्याबरोबर काम करू. तुमच्या मुलाबरोबरही काम करू, असा शब्द दिला होता. मात्र, तो पूर्ण करता येत नाही याची खंत आहे, असे त्यांनी नमूद केले.
मी पक्षाचा सामान्य प्रवक्ता होतो. ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. आता कुठेतरी थांबण्याची गरज आहे. आता इथे आपल्याला काही काम उरलेले नाही. अपेक्षा कमी असतानाही अपक्षा पदरात आली. क्षमतेनुसार काम दिले गेले नाही. सन्मानही मिळाला नाही. त्यामुळे आता थांबले पाहिजे, असे महाजन म्हणाले.
पक्षाच्या प्रचारात सहभागी करून घेण्यात यावे, संघटनेत काही महत्त्वाची जबाबदारी मिळावी, अशा आपल्या माफक अपेक्षा होत्या. मात्र, त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तरीही आपण कोणाला दोष देऊ इच्छित नाही. मुंबईतील मेळाव्यानंतर पक्षाला आपली फारशी गरज उरली नाही, हे व्यवस्थित लक्षात आले. तरीही दोन महिने वाट पाहिली. मात्र, काही सकारात्मक घडले नाही. उलट आपल्याला दारापर्यंत आणून सोडले आहे, हे जाणवले. आता दारात ताटकळत उभे राहायचे की दाराकडे पाठ करून पुढे व्हायचे, याचा निर्णय घ्यायचा होता. तो घेतला, असेही महाजन म्हणाले.