- राज्य
- हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले?
हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले?
बाळा नांदगावकर यांचा सवाल
नाशिक: प्रतिनिधी
राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या, अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अन्य काही विषयांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाळा नांदगावकर बोलत होते. महापालिका निवडणुकीसाठी या दोन पक्षांची युती होण्याची चर्चा सुरू असतानाच स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत असल्याचे या मोर्चावरून दिसून येत आहे.
नाशिक शहरापासून सुरू झालेल्या हनी ट्रॅप प्रकरणाने राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात देखील मोठ्या प्रमाणावर खळबळ उडवून दिली. या प्रकरणात तब्बल 15 वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि राजकीय नेते यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाचे पुढे काय झाले, असा सवाल नांदगावकर यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या नाशिकची आज काय अवस्था आहे, असा सवालही त्यांनी केला.
नाशिककरांचे आमच्यावरचे प्रेम कमी झाले आहे. मात्र, आमचे नेते राज ठाकरे यांचे नाशिक वरीलप्रेम कमी झालेले नाही. नाशिक शहर आणि नाशिककरांच्या विकासासाठी आम्ही तत्पर आहोत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्याला वाचा फोडण्यासाठी मोर्चे काढावे लागतात, असेही नांदगावकर म्हणाले. नाशिकची कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला.