'संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करा'
शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
चिथावणीखोर देशविरोधी विधाने करणारे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर केले आहे.
नेपाळमध्ये अराजकाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथल्या अर्थमंत्र्यांना आंदोलक जमावाकडून मारहाण झाल्याचे चित्रण समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून राऊत यांनी त्यावर, हे कुठेही घडू शकते, अशी टिप्पणी केली आहे. त्यांचा रोख भारताकडे, महाराष्ट्राकडे होता, असा शिंदे गटाचा दावा आहे.
राऊत सातत्याने समाजमाध्यमातून देशविरोधी गरळ ओकत असतात. चिथावणीखोर, भडकाऊ विधाने करीत असतात. त्यांच्या अशा विधानांमुळे शहरात बॉम्ब स्फोटाच्या धमक्या देणे, अफवा पसरवणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.