९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड!
पुणे, प्रतिनिधी
९९व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ३२ वर्षांनंतर मराठ्यांची ऐतिहासिक राजधानी सातारा पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषवणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने बैठकीत ही निवड करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले असून, त्याला डॉ. राजेंद्र माने आणि डॉ. उमेश करंबेळकर यांच्यासह उपस्थित कार्यकारिणी सदस्यांनीही अनुमोदन दिले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने सक्रिय राहिले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी दिल्लीतील आंदोलनात भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठी एक लाख पत्रांची मोहीमही त्यांच्या हस्तेच सुरू झाली होती.
"माझ्या वडिलांनंतर हे पद मिळणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. हे शताब्दीपूर्व संमेलन साताऱ्यात अतिशय देखणे आणि दिमाखदार करु. सर्व मराठी बांधवांचे जोरदार स्वागत करू," असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निवडीनंतर सांगितले.
या निवडीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी आणि कार्यवाह सुनिताराजे पवार यांनीही अभिनंदन व्यक्त केले आहे.
000