- राज्य
- राजद, काँग्रेस महाआघाडीने एमआयएमला नाकारले
राजद, काँग्रेस महाआघाडीने एमआयएमला नाकारले
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ओवेसीं यांना धक्का
पटना: वृत्तसंस्था
राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीत जातीय पक्षांना स्थान नसल्याचे सांगत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाला प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना धक्का बसला असून त्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी एमआयएम महाआघाडीत सहभागी होऊ इच्छिते, असे पत्र पक्षाच्या वतीने महाआघाडीला देण्यात आले. मात्र, महाआघाडीने एमआयएमलाच जातीयवादी पक्ष ठरवून प्रवेश नाकारला आहे. यापूर्वीच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील महाआघाडीने एमआयएमला झिडकारले होते.
आता एमआयएम तिसऱ्या आघाडीच्या शोधात आहे. मात्र, महाआघाडीने तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेची खिल्ली उडवली आहे. तिसरी आघाडी उभी राहिली तर तिची भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून संभावना होऊ शकते. त्यामुळे हा डाव भाजप आणि खुद्द तिसऱ्या आघाडीवर उलटू शकतो, असा महाआघाडीचा दावा आहे.