कामगार कायद्यांविरोधात कराडात विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांची निदर्शने
देशव्यापी एकदिवसीय संपात सहभाग; तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी
कराड : देशभरातील केंद्रीय कामगार संघटना, अखिल भारतीय फेडरेशन आणि स्वतंत्र क्षेत्रीय संघटनांच्या वतीने केंद्र सरकारने तयार केलेल्या चार नव्या श्रमसंहितांच्या विरोधात देशव्यापी एकदिवसीय संपाचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी कराड शहरातील विक्री संवर्धन (सेल्स प्रमोशन) कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
या आंदोलनात कराड युनिटचे सचिव संताजी जाधव यांच्यासह निखिल शहा, सुहास पवार, रवी शिंदे, अमोल फल्ले, अमोल थोरात, अभिजीत पाटील, आकाश सरतापे, विजय कुंभार, तानाजी पाटील आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी नवीन श्रमसंहितांद्वारे अनेक वर्षांच्या संघर्षातून मिळवलेले पारंपरिक कामगार कायदे रद्द करण्यात आले असून, नव्या संहितांचा कल पूर्णतः कार्पोरेटधार्जिणा आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कामाच्या तासात वाढ, निश्चित कालीन रोजगार नाकारणे, वेतन व पेन्शन विषयक असुरक्षितता यामुळे कामगारांचे हक्क धोक्यात येणार असल्याचे निदर्शकांचे म्हणणे होते.
दरम्यान, हे आंदोलन शांततेत पार पडलं असून, शासनाकडून मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
आंदोलकांच्या मागण्या
आंदोलकांनी चारही श्रमसंहितांची अंमलबजावणी त्वरित रद्द करावी, कामगारहिताचे कायदे नव्याने तयार करून त्वरित लागू करावेत, कामाच्या तासात वाढ करू नये, निश्चित कालीन रोजगारांना मान्यता द्यावी, कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करावी, वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामकाजासाठी स्पष्ट वैधानिक नियमन करावे, किमान मासिक वेतन ३०,००० रुपये व मासिक पेन्शन १०,००० रुपये करावी, आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या आहेत.
000