मसूर पोलीस ठाण्याच्या निधीसाठी मनोजदादांचा आवाज अधिवेशनात घुमला
मसूर : मसूर पोलीस ठाण्याच्या निधीसाठी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा सध्या सुरू असलेल्या मुंबईत विधानभवनातल्या पावसाळी अधिवेशनात आवाज घुमला. पोलीस ठाण्याच्या निधीसाठीचा प्रश्न विधिमंडळात आवर्जून मांडल्याने प्रलंबित असलेल्या पोलीस ठाण्याची नवीन इमारत मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. विस्तारित व सुसज्ज ठाण्याच्या इमारतीसाठी तमाम नागरिकांची मागणी दोन वर्षापासूनची आहे.
निमशहरी प्रकारात मोडणाऱ्या मसूर गावचा झपाट्याने विस्तार वाढत आहे. व्यावसायिक केंद्र बनलेल्या गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मसूर पोलीस ठाण्याची निर्मिती दोन वर्षापूर्वी झाली. कार्यक्षेत्राचा कामकाजाचा व्याप पाहता स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. ती झालीही. मात्र सध्या पोलीस ठाण्याचे कामकाज पाटबंधारे विभागाच्या इमारतीत सुरू आहे. स्व मालकीची पोलीस ठाण्याची इमारत नसल्याने सध्या नाईलाजास्तव कमी जागेत कामकाज सुरू आहे. मुख्यतः पोलीस ठाणे सध्या एका बाजूला लांब अंतरावर असल्याने नागरिकांना ते गैरसोयीचे व त्रासदायक ठरत आहे. जुन्या पोलीस दूरक्षेत्राच्या मागे पोलीस ठाण्याच्या मालकीची स्वतंत्र मोठी विस्तारित व प्रशस्त मोकळी जागा आहे. मात्र इमारतीसाठी निधी उपलब्ध नव्हता. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या निधीसाठी अधिवेशनात प्रश्न मांडला. निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 32 गावे येतात. कार्यक्षेत्राचा व्यापही मोठा आहे. कार्यक्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. चोरी - दरोडे, आत्महत्या, जमिनी संदर्भातील वादातून उद्भवणारी भांडणे, मारामाऱ्या, किरकोळ तक्रारी ,अवैद्य व्यवसाय आदी गुन्ह्यांचे प्रमाण आहे. वर्षभरात कार्यक्षेत्रातील गावांच्या यात्रा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मोहरम, मंत्र्यांचे दौरे, आंदोलन, अपघात असे प्रकार सुरूच असतात. या सर्व बाबी पाहता पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. ती झालीही. आता पोलीस ठाण्याच्या स्व मालकीची नवीन इमारत होणे गरजेचे आहे. इमारतीची मागणी दोन वर्षापासूनची आहे. मात्र निधी नसल्याने इमारतीचे काम प्रलंबित होते. मात्र आमदार मनोजदादा घोरपडे यांनी अधिवेशनात निधीसाठीचा प्रश्न मांडल्याने पोलीस ठाण्याची नवीन इमारत उभी राहण्यासाठीचे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार घोरपडे सहकुटुंब विधानभवनात..
कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे हे आपल्या पत्नी व मुलासमवेत मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात दाखल झाले. अधिवेशनातील कामकाज कसे चालते याबाबत उत्सुकता त्यांच्या कुटुंबाला होती. अधिवेशनातील कामकाजाची पद्धत गॅलरीत बसून त्यांच्या कुटुंबीयांनी अनुभवली.
000