- राज्य
- राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोळा चितळांचा मृत्यू
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोळा चितळांचा मृत्यू
मॅलिग्नंट कॅटरल फिव्हर विषाणूंमुळे बळी गेल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल
पुणे: प्रतिनिधी
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात 6 ते 12 जुलैदरम्यान 16 चितळ मरण पावले. हे प्राणी एमसीएफ या विषाणूंचे बळी ठरल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.
अल्पावधीत एवढ्या संख्येने प्राण्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अवयवांचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी काही मृत चितळांमध्ये मॅलिग्नंट कॅटरल फीव्हर (एमसीएफ) विषाणू आढळल्याचे प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. वन्यजीवांमध्ये या विषाणूची लागण झाल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.
हा विषाणू मानवासाठी निरुपद्रवी आहे. मात्र, वन्यजीव आणि पशुधनासाठी अत्यंत घातक आणि जीवघेणा आहे. त्याचा संसर्ग मृत्यूदर वेगाने वाढवतो. मुख्यतः शेळ्या-मेंढ्यांमधून पसरत असलेला हा दुर्मिळ विषाणू गुरे, हरीण. आणि गव्यासारख्या बलाढ्य प्राण्यांनाही बाधित करतो. आजारी प्राण्यांना ताप, नाक-डोळ्यातून स्त्राव, तोंडात फोड अशी लक्षणे दिसतात. केंद्रीय मंत्रालयाने राज्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.