- राज्य
- ... हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारे
... हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारे
राजकारणाच्या सद्य स्थितीबाबत शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता
पुणे: प्रतिनिधी
अधिवेशन काळात महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी गोंधळ होतो. तहकुबी येते. सत्ताधारीच कामकाज बंद पाडतात. हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन (८१ वा वाढदिवस) समारंभात ते बोलत होते. शरद पवार यांनी आपल्या भाषणात राजकारणाच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करतानाच समविचारी लोकांना एकत्र घेऊन हे चित्र बदलण्याचा निर्धार देखील व्यक्त केला.
संसदेचे कामकाज बंद पाडणे, महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करणे आणि सत्तेचा गैरवापर करणे, हेच सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. ही परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे. हे चित्र बदलण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येऊन पुन्हा गांधी, नेहरू विचारांचा प्रभाव निर्माण करणे आवश्यक आहे, असे पवार यांनी नमूद केले.
सरकारच्या बेबंदशाहीला वेसण घालण्याच्या निमित्ताने मी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राजीव गांधी व इतर समविचारी पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा केली. त्यात ठरल्यानुसार सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चा काढला. त्यासाठी कधी नव्हे ते 300 खासदार एकत्र आले. शांततेने आंदोलन केले. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. लोकशाही टिकवण्यासाठी, संसदीय राज्यपद्धती टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे करावेच लागणार आहे, असेही पवार म्हणाले.
होय, मीच पाडले वसंतदादांचे सरकार
ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्या राज्य सरकारमध्ये पवार मंत्री होते तेच सरकार पवारांनी विश्वासघाताने पाडल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमी केला जातो. याबाबत पवार यांनी प्रथमच जाहीर कबुली दिली. वसंतदादा पाटील आमचे नेते होते. मार्गदर्शक होते. मात्र, ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये होतो. निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. मात्र, आम्हा तरुण मंडळींच्या मनात इंदिरा काँग्रेसबद्दल राग होता. त्यामुळे आम्ही वसंतदादांचे सरकार पाडायचे ठरवले आणि पाडलेही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रीपदासाठी दादांनीच सुचवले आपले नाव
दहा वर्षानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. राज्यात मुख्यमंत्री कोणाला करायचे असा प्रश्न होता. यावेळी अनेक नावांवर चर्चा सुरू होती. मात्र, मागचे सगळे विसरून वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपले नाव निश्चित केले. आता पक्ष सावरायचा असेल तर त्याचे नेतृत्व शरद पवारांकडेच द्या, असे दादांनी निक्षून सांगितले. ज्यांचे सरकार मी पाडले, त्यांनी गांधी, नेहरूंचा विचार टिकवण्यासाठी मोठ्या अंत:करणाने आपल्याला पाठिंबा दिला. त्या वेळचे नेतृत्व असे होते. आता मात्र काळ बदलला आहे, असेही पवार म्हणाले.