- राज्य
- सर्व शाळांमध्ये स्थापन होणार 'शुगर बोर्ड'
सर्व शाळांमध्ये स्थापन होणार 'शुगर बोर्ड'
लहान वयात मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता उपाययोजना
मुंबई: प्रतिनिधी
सध्याच्या काळात लहान वयातच मधुमेहाच्या विकाराने गाठण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये 'शुगर बोर्ड' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ दिव्या दत्ता यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी त्याबद्दल सूचना दिल्या आहेत.
भारतात सध्या मधुमेह मोठ्या प्रमाणात वाढत असून लवकरच भारत ही मधुमेहाची राजधानी बनेल, अशी भीती वर्तवली जात आहे. मधुमेहाला कोणत्याही वयाची मर्यादा राहिलेली नसून अगदी लहान वयामध्ये देखील मुलांना मधुमेह झाल्याचे आढळून येत आहे.
या पार्श्वभूमीवर शाळेतील शुगर बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, खेळ आणि व्यायामासाठी वेळेचे नियोजन, मधुमेहासंबंधी जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शुगर बोर्डाच्या स्थापनेबाबत त्वरित पावले उचलण्याच्या सूचना कुलाळ यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत शिक्षण संस्थांनी अधिक सतर्क राहण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे.