- राज्य
- गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे अपहरण व सुटका
गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे अपहरण व सुटका
पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला हत्या करण्याचा डाव
सोलापूर: प्रतिनिधी
राजकीय वादातून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. अपहरण प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे
सन 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या अमित सुरवसे यांनी पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. या प्रकरणावरून पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याने अमितला मारहाण केली. त्यानंतर या दोघांनी समजूतीने हे प्रकरण मिटविणचे सांगण्यात आले.
मात्र, आपल्याला झालेल्या मारहाणीचा राग अमित सुरवसे याच्या मनात कायम होता. शरणू हांडे याचा सूड घेण्याची संधी तो शोधत होता. त्याच उद्देशाने त्याने पुणे येथून एक गाडी भाड्याने घेतली. आपल्या मित्रासह शरणूच्या घराबाहेर थांबून शस्त्राचा धाक दाखवून अमित व त्याच्या साथीदारांनी त्याचे अपहरण केले. त्याची हत्या करण्याच्या उद्देशाने गाडीतून त्याला कर्नाटकच्या दिशेने नेण्यात आले.
शरणू हांडे यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या अपहरणाबाबत माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत चार पथके कर्नाटकच्या दिशेने रवाना केली. त्यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व मार्गांची नाकाबंदी केली. त्यापैकीच एका पथकाला कर्नाटकातील होर्टी गावाजवळ अमित सुरवसे याच्या गाडीत शरणू हांडे गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना जेरबंद करून शरणू हांडे याला सोलापूर येथे रुग्णालयात दाखल केले. त्यामुळेच त्याचे प्राण वाचू शकले आहेत. पोलिसांनी अमित सुरवसे व त्याच्या साथीदारांवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.