- राज्य
- 'ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी...'
'ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी...'
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
कोणाचे आणि काय ऐकले नाही म्हणून आपल्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली हे जगजाहीर आहे. किडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत. आदेशानुसारच त्यांनी कारवाई केली आणि आता आरोपपत्र दाखल केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
आरोपपत्र दाखल झाले म्हणजे तपास पूर्ण झाला आहे आणि आता निकालाचा चेंडू न्यायदेवतेच्या कोर्टात आहे. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास आहे. इथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. महाराष्ट्राने कधीही लाचारी आणि फितुरीला थारा दिलेला नाही. संघर्षालाच डोक्यावर घेतले आहे हा इतिहास आहे, असे रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर नमूद केले आहे.
महाराष्ट्र सहकारी बँकेच्या काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जप्त केलेले काही सहकारी साखर कारखाने लिलावाची कायदेशीर प्रक्रिया न राबवता अत्यंत कमी किमतीला आपले नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. याच प्रकारे रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना मिळवल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालावरून सक्तवसुली संचालनालयाने सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारांचा तपास केला. मार्च 2023 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बारामती अॅग्रोच्या 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती कारवाई केली. या मालमत्तेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील 161.30 एकर जमीन, एक साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता. ईडीचा आरोप आहे की ही मालमत्ता मूळतः कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) यांच्या मालकीची होती, मात्र ती बारामती अॅग्रोने कथित बनावट लिलाव प्रक्रियेतून खरेदी केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, या मालमत्तेची खरेदी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणारी आहे, कारण ती गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाच्या स्वरूपात आहे.