- राज्य
- शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान
शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान
बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याची दिली तंबी
मुंबई: प्रतिनिधी
आमदार आणि मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असून यापुढे कोणाचेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांना तंबी दिली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्या नंतर त्यांनी आपल्या कृतीचे समर्थनही केले होते. या घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
केवळ पाच वर्षाच्या कालावधीत संपत्ती मध्ये कित्येक पटीने वाढ झाल्यामुळे आणि आयकर विभागाच्या नोटीशीमुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नाव आधी चर्चेत आले. त्यानंतर शयन कक्षात नोटांनी भरलेल्या बॅगशेजारी बसलेले शिरसाट यांचे चित्रण प्रसिद्ध झाले. त्यामुळे शिरसाट यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. अर्थात, ती बॅग नोटांनी नव्हे तर कपड्यांनी भरलेली असल्याचा शिरसाट यांचा दावा आहे.
या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादग्रस्त आमदार आणि मंत्र्यांवर नाराज असून त्यांनी या दोघांसह टीकेचे लक्ष्य होणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना कडक शब्दात समज दिल्याचे सांगण्यात येत आहे.