- राज्य
- 'वेळ देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा...'
'वेळ देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा...'
अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना दिली तंबी
नागपूर: प्रतिनिधी
पक्ष विस्ताराच्या कामासाठी मंत्र्यांनी वेळ देणे अत्यावश्यक आहे. ज्यांना पक्षासाठी वेळ काढता येत नसेल त्यांनी खुर्च्या खाली कराव्या. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, अशी तंबी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना दिली.
पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिरात पहिल्याच सत्रात अनेक मंत्री आणि आमदार वेळेत उपस्थित नसल्याचे पाहून अजित पवार संतप्त झाले. त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली.
पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आठवड्यातील तीन दिवस मुंबई आणि एक दिवस मतदार संघात पक्ष विस्ताराच्या कामात वेळ देणे आवश्यक आहे. ज्या मंत्र्यांना पक्षापेक्षा इतर कामे महत्त्वाची वाटत असतील त्यांनी जागा खाली कराव्या. पालकमंत्री पद मिळालेल्या मंत्र्यांना त्या त्या जिल्ह्यात जावेच लागेल. दौरे करताना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घ्या. अनेक मंत्री जिल्हाध्यक्षांना विचारतच नसल्याच्या तक्रारी आहेत. असे चालणार नाही, असे पवार यांनी सुनावले.
पक्ष संघटनेचा विस्तार, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक पदांच्या निवड यामध्ये मंत्र्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. पक्ष वाढवताना पक्षात आपण प्रवेश देत असलेल्या व्यक्तीची प्रतिमा समाजात चांगली असल्याकडेही लक्ष ठेवा, अशी सूचना देखील पवार यांनी मंत्र्यांना केली. काम न करता प्रसिद्धीच्या मागे लागू नका. जमिनीवरच राहा, असा टोला देखील त्यांनी लगावला.