- राज्य
- 'धर्माच्या नावाखाली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन अयोग्य'
'धर्माच्या नावाखाली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन अयोग्य'
कबुतरखाना प्रकरणी राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून कबुतरांना खायला घालण्याचा आग्रह जैन बांधवांनी सोडावा. धर्माच्या नावाखाली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे अयोग्य आहे. जैन मुनिंनी देखील याचा विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कबुतरखान्यांच्या वादाबाबत ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कबुतरांमळे मानवी आरोग्यावर काय काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे अनेक वैद्यकीय तज्ञांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यास बंदी केली आहे. ही बंदी मोडून कोणी कबुतरांना खायला घालत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असेही ठाकरे म्हणाले.
एकदा एखाद्याने न्यायालयाच्या आदेशाचा मान न राखता कबुतरांना खायला द्यायला सुरुवात केली की त्याचे अनुकरण करून इतर लोकही तेच करायला लागतील. मग उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशांना काय अडथळे, असा सवाल ठाकरे यांनी केला.