- राज्य
- 'लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा होणार कोरा'
'लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा होणार कोरा'
ढगफुटी आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विविध मंत्र्यांचे दावे
यवतमाळ: प्रतिनिधी
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असून त्याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करतील, अशी ग्वाही मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात हरितक्रांतीला चालना देणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनानिमित्त १३ शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृती प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा विचार मंत्रिमंडळात सुरू असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आतापर्यंत हे आश्वासन पूर्ण करण्यात न आल्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी दिलेली ग्वाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यापूर्वी देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यांनी योग्य वेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील योग्य वेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल आणि त्यांचा सातबारा कोरा केला जाईल, अशी खात्री दिली आहे.. या पार्श्वभूमीवर राठोड यांनी केलेली घोषणा महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
यापूर्वी राज्याला, विशेषत: या राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या अभावी संकटाला सामोरे जावे लागले होते. मागील काही दिवसापासून राज्यभर सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहे. यापूर्वी पाण्याअभावी कोरडा दुष्काळ आणि आता अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे.