संतसाहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरआवश्यक'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
पुणे: प्रतिनिधी
भागवत धर्माचे जतन करण्याचे कार्य वारकरी बांधवांनी केले असून संतसाहित्याचा अनमोल ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशेव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजन करून करण्यात आला. मंदिरावर २२ किलो सोन्याचा कळस बसविण्यात येत असून कलशपूजन यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. वारकरी बांधवांनी निर्धार केल्यास काय घडू शकते, याचे हा कलश हे उदाहरण आहे, असे उद्गार शिंदे यांनी काढले.
या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. मी आणि मुख्यमंत्री भाग्यवान आहोत, असे शिंदे यांनी नमूद केले. संत ज्ञानेश्वर हा वारकऱ्यांचा श्वास आहे. ज्ञानोबा तुकोबाचा गजर ही मोठी प्रेरणा आहे. आळंदी हे भागवत धर्माचे तीर्थस्थळ आहे, असेही ते म्हणाले.
नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन
आपली कामे पटापट मार्गी लागतात. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, असे आपले काम आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी आले आहेत. दीर्घ काळापासून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची हाकाटी उठवली जात आहे. मात्र ही योजना कधीही बंद होणार नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.