'मैत्रीमुळे घेतली राज ठाकरे यांची भेट'
ठाकरे फडणवीस भेटीवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांचे पार्श्वभूमीवर होत असलेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र ही भेट राजकीय स्वरूपाची नसून केवळ मैत्रीसाठी राज यांना भेटल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका हस्तगत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कसून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप मनसेला बरोबर घेणार असल्याचेही चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले 'राज'पुत्र अमित ठाकरे भाजपाच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाणार असल्याचेही चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळा विविध कायास बांधले जाऊ लागले. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना या चर्चांना पूर्णविराम दिला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री म्हणून आपण शपथ घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्याला दूरध्वनीवर संपर्क साधून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मी त्यांना आपल्या घरी येईल, असे सांगितले होते त्यानुसार आज आपण त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर चहापान केले. गप्पा मारल्या. या भेटीत कोणत्याही स्वरूपाची राजकीय चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Comment List