- राज्य
- '... आणि अदानीला शेलू, वांगणीला पाठवू'
'... आणि अदानीला शेलू, वांगणीला पाठवू'
गिरणी कामगार, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांना धारावीत जागा देण्याची ठाकरे यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी
आतापर्यंत धारावीकरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारने धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली आहे. मात्र, धारावीच्या जमिनीवर गिरणी कामगारांच्या कुटुंबांना, पोलीस आणि सफाई कामगारांना घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत अशी आपली मागणी आहे. अदानीला शेलु आणि वांगणीला पाठवून देऊ, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आझाद मैदानावर धरणे धरून बसलेल्या शिक्षक आंदोलकांना प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी ठाकरे बोलत होते.
... म्हणून आम्ही एकत्र आलो
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि मी दोघेही प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे हे दोघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आघाडीवर होते. आमच्या डोळ्यासमोर मुंबईचे लचके तोडले जात असतील तर आम्ही आपसात भांडत बसायचे का, म्हणून आम्ही एकत्र आलो. महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणसासाठी आम्ही आपसातील भांडण मिटवली आणि एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आता जो कोणी मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उपटून टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यामुळे माघार घेऊ नका. हिम्मत हरू नका. जोपर्यंत आपण एकत्रित येत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. आपल्यातली एकजूट कायम ठेवा. आम्ही आपल्याला न्याय मिळवून देऊ हा शब्द आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी आंदोलक शिक्षकांना दिली.