- राज्य
- पक्ष बांधणीसाठी सरसावले स्वतः उद्धव ठाकरे
पक्ष बांधणीसाठी सरसावले स्वतः उद्धव ठाकरे
शिवसेना शिंदे गट आणि भाजपने पोखरलेल्या संघटनेला सावरण्याचे प्रयत्न
नाशिक: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने पोखरून काढलेल्या नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सावरण्यासाठी आता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावले आहेत. या महिन्याच्या खरीला तीन दिवस नाशिक येथे तळ ठोकून पक्ष सावरण्याच्या दृष्टीने ते उपाययोजना करणार आहेत.
नाशिक शिवसेना ठाकरे गटाची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले आहेत. चार दिवसांपूर्वी ज्या मामा राजवाडे यांच्यावर महानगर प्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली, तेच भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याची वेळ यावी, अशी ही परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जुलै अखेरीला तीन दिवस नाशिकला तळ ठोकून असणार आहेत. या काळात पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले जाणार आहेत. पक्षाच्या कार्यकारणीतही मोठे बदल केले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्या, कार्यकर्त्यांना बळ देण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे.