- राज्य
- 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही...'
'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही...'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिली ग्वाही
पुणे: प्रतिनिधी
मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील अशा लोकांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर त्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दिली.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आद्य क्रांतिवीरांच्या जाज्ज्वल्य क्रांतिकार्याचे स्मरण त्यांनी केले.
महायुती सरकारने सर्व समाजाचा शाश्वत विकास करण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यामुळे एकाचे काढून दुसऱ्याच्या ताटात घालण्याचे आपले धोरण नाही. ते इंग्रजांचे धोरण होते. मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही आणि ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
आपले सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी योजना अमलात आणणारे सरकार आहे. जोपर्यंत ओबीसी समाज विकासाच्या मार्गावर मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत शिवकार्याची पूर्तता होत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.